आलेगाव शिवारात ट्रॅक्टर विहिरीत पडून ८ महिला दगावल्याची शक्यता, सर्व महिला वसमत तालुक्यातील गुंजच्या



वसमत / खदीर अहेमद

वसमत तालुक्यातील गुंज येथील रहिवासी असलेल्या आठ महिला व ड्राइवर सहित आलेगाव (जि. नांदेड) शिवारात ट्रॅक्टर विहीरीत पडून दगावल्याची भिती व्यक्त केली जात आहे. शुक्रवारी ता. 4 सकाळी  आठ ते नऊ दरम्यान हा प्रकार घडला आहे. या महिला हळद काढणीच्या कामासाठी जात होत्या.



याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील गुंज येथील 10 महिला व एक पुरुष गुंज शिवारालगत आलेगाव (जि. नांदेड) एकाच्या शेतात हळद काढणीच्या कामासाठी निघाल्या होत्या त्यांच्या वाहतुकीसाठी टॅक्टर आणण्यात आले होते. 


या सर्व महिला ट्रॅक्टर ट्रॉलीमधे बसून निघाल्या होत्या यावेळी आलेगाव शिवारात दोन शेतामध्ये असलेल्या चारी मधून ट्रॅक्टर वर घेण्याच्या प्रयत्नात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले अन ट्रॅक्टर विहीरीत कोसळले.



या अपघातामध्ये आठ महिला ट्रॉली खाली दबून दगावल्याची भिती व्यक्त केली जात आहे. या घटनेत एक पुरुष व दोन महिला कशाबशा  स्थानिकांच्या मदतीने बाहेर  आल्या. मात्र त्या काहीही बोलण्याच्या मनःस्थितीत नाहीत. 

घटनास्थळी नांदेड  ग्रामीण पोलिसांचे पथक आणि वसमत ग्रामीण पथक दाखल झाले आहे. तर घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी तातडीने महसूल अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना घटनास्थळी रवाना केली आहे. वसमतच्या तहसीलदार शारदा दळवी, मंडळ अधिकारी प्रियंका खडसे, गुंजचे पोलिस पाटील अंकुश सुर्यवंशी यांच्यासह गावकरी घटनास्थळी दाखल झाले आहेत. ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे जमादार विजयकुमार उपरे मधुकर आडे यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे दरम्यान, विहीरीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी असल्यामुळे आत ट्रॅक्टर व ट्रॉली बुडाल्याचे दिसून येत असून विहीरीमध्ये दगावलेल्या महिलांची माहिती घेण्याचे काम सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे.


या घटनेमुळे गुंज गावावर शोककळा पसरली आहे.


               सर्व महिला ट्रॅक्टर ट्रॉलीमधे बसून हळद काढणीच्या कामासाठी निघाल्या होत्या यावेळी आलेगाव शिवारात दोन शेतामध्ये असलेल्या चारी मधून ट्रॅक्टर वर घेण्याच्या प्रयत्नात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले अन ट्रॅक्टर विहीरीत कोसळले.